छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): राज्यातील मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान १७नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले आणि मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली. या मोहिमेद्वारे संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, निदान
झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत. घरोघर भेटींद्वारे लपलेले व निदान न झालेले रुग्ण शोधणे, त्यांना उपचाराखाली आणणे,
संसर्गाची साखळी खंडित करणे तसेच समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती वाढवणे ही मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. २०२७पर्यंत ङ्गशून्य कुष्ठरोग प्रसारफ हे ध्येय गाठण्याकडे मोहिमेची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे. उद्घाटनप्रसंगी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. शिवकुमार हलकुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर, लेप्रसी विभागाचे डॉ. नाथराव फड, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकतकर, डॉ. हाश्मी, आनंद खेडकर, संतोष चव्हाण, संतोष ढासाळकर, विकास बोराडे, चंदन गणोरे तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














